In Marathi, whose English translations appear in The Secret Master.
1. Page 27
By Arun Kashalkar
ते शब्दही सरले आज कहाणी सरली
ती प्रीत आपुली आज कुठे ना उरली
का दोन मनाचे होते धागे जुळले
गुंफिली त्यात का आठवणीची फुले
निर्माल्य होउनी आज निखळती सगळी
स्पर्शात आपुल्या वसंत होता फुलला
संगती केवडा चंहुकडे दरवळला
वैराण भासते आज धरित्री सगळी
मागे न राहिले अता पुराणे नाते
का भेट आपुली पुन्हा पुन्हा मग स्मरते
थरथरत्या ओठी आर्त विराणी उरली
2. Page 91.
By Arun Kashalkar
चंद्रकलांनी सडे शिंपिता आज त्यात न्हाले
सख्या हे अंग अंग भिजले
एकान्ती तव वाट पाहते
नवथर प्रेमाचे ये भरते
हळुच मागुनी रातराणी ती
हासत येता मी बावरले ||
नीलजली मम नेत्र उमलले
आणि लाजुनी काही बोलले
कुणी आणिले स्वप्न मधुर हे
मनात पण काहुर दाटले
अधिर जाहले तुज भेटाया
मोहरली बघ माझी काया
जवळ मला तू घेई सखया
मन हे आतुरले
3. Page 148
Excerpt from a poem.
By Bhausaheb Patankar
नाजूकता ऐसी कुणी पाहिली नाही कधी
नजरही आम्ही तिच्यावर टाकली नाही कधी
भय आम्हा नाजूकतेचे हेच होते वाटले
भारही नजरेतला या सोसेल नव्हते वाटले
4. Page 150
Excerpt from a poem.
By Bhausaheb Patankar
हाय! तु आहॆ तरीही आम्हा असा धॊका दिला
सांग ना मृत्यो, तुला आहे कधी का मी दिला
5. Page 391
By Arun Kashalkar
अहंकाराचं बारसं
एक निष्पाप निरागस नवजात जीव शांत झोपला होता
पण तुम्ही त्याला चाळवलंत कारण,
तुम्हाला जन्म द्यायचा होता एका अहंकाराला!
म्हणून तुम्ही त्याचं बारसं केलं!
स्वतःच्या, बापाच्या आणि घराण्याच्या नावांचा
तिहेरी मुकुट त्याच्या डोक्यावर घातलात अन्
त्याला एक गोंडस नाव दिलंत
पुढं जाणीव झाल्यावर तोच अहंकार
गोंजारु लागला स्वतःला आणि गुरगुरू
लागला तुमच्या, आमच्या सर्वांवर!
शेजारच्या बंड्याशी त्याचं भांडण झालं
तेव्हा तो गुरगुरला
‘मला ‘अरुण नागेश कशाळकर’
म्हणतात, लक्षात ठेव!’
